व्यक्तीविशेष : श्रीराम लागू

डॉ. श्रीराम लागू यांनी रंगभूमीवर पाऊल टाकले त्या वेळेस तालीममास्तराचा दिग्दर्शक व्हायला नुकतीच सुरुवात झाली होती. नटांचेही अभिनेते होऊ शकतात, किंबहुना ते तसेच व्हायला हवेत याचीही जाणीव निर्माण व्हायला लागली होती. तोपर्यंत तालीममास्तर जे सांगेल ते दमदारपणे रंगभूमीवर सादर करणे आणि सरावाने योग्य त्या ठिकाणी टाळी घेणे म्हणजे अभिनय असे मानले जात असे. बालगंधर्वाच्या प्रभावातून एक मोठा, वयाने ज्येष्ठांचा वर्ग बाहेर यायचा होता आणि वयानेच कनिष्ठांना आपला सूर सापडायचा होता. दिल्लीत इब्राहिम अल्काझी आणि पुण्यामुंबईत सत्यदेव दुबे वा भालबा केळकर उद्याची रंगभूमी घडवू पाहात होते. त्या वेळी उच्चशिक्षाभूषित डॉ. लागू रंगभूमीवर पदार्पण करते झाले. यातील उच्चशिक्षाभूषित हा भाग महत्त्वाचा. याचे कारण त्या वेळी दोन पद्धतीने माणसे तोंडास रंग लावीत. रंगभूमीपोटीच्या ठार वेडापायी घरदार सोडून गेलेले आणि दुसरे अन्य काही तितके जमले नाही म्हणून रंगभूमीवर स्थिरावलेले. डॉक्टरांपासून यातील बदलास सुरुवात झाली असे म्हणता येईल. मराठी समाजात बख्खळ पसा देणारी चांगली वैद्यकी सोडून रंगमंचावर येणे ही त्या काळी.. आणि काही प्रमाणात आजही.. खूप मोठी गोष्ट ठरते. डॉक्टरांनी रंगभूमीवर पदार्पण करायचा आणि भालबांची पीडीए आकारास यायचा काळ एकच.

तोच मराठी रंगभूमीच्या समंजसवाढीचा काळ. यात डॉक्टरांची भूमिका मोठी. अभिनेत्याने स्वतंत्रपणे म्हणून काही विचार करायचा असतो, वाङ्मयाच्या परिशीलनाने स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडवायचे असते याची जाणीव नट म्हणवून घेणाऱ्यांना होती असे म्हणता येणार नाही. रंगभूमीवर वेडय़ाची भूमिका करणारा प्रत्यक्ष जीवनातही कसा तसा झाला याच्या कहाण्या अभिमानाने सांगितल्या आणि चघळल्या जात. कारण कलाविष्कार.. मग ते चित्र असो वा नाटय़.. हा कशाच्या तरी ‘डिट्टो’ तसाच असायला हवा इतकीच काय ती कलाजाणीव बहुसंख्यांना होती. त्यातूनच मग रंगभूमीची सेवा किंवा भूमिका जगणे वगैरे थोतांडे जन्मास आली. डॉक्टरांचा मोठेपणा असा की हेच खोटे पुढे रेटत मोठेपणा मिरवण्याचे त्यांनी काही एक बुद्धिनिष्ठतेने ठरवून टाळले. भूमिका जगायची वगैरे काही नसते, आपण तशी ती जगत आहोत असा अभिनय तेवढा करायचा आणि नाटक संपल्यावर तो अंगरख्याप्रमाणे काढून ठेवायचा असे लागू मानत आणि तसेच ते वागत. याचा दृश्य पुरावा त्यांच्या रंगभूमीबा वर्तनातून येत असे. आपले नटपण मिरवणारे अनेक अभिनयसम्राट खऱ्या जगण्यातही अभिनय केल्याप्रमाणे.. म्हणजे तसेच ते पॉझ घेणे वगैरे.. जगतात. रंगभूमीवरून उतरले की लागू हे सर्वसामान्यांप्रमाणेच असत. वरकरणी हे सोपे वाटेल. पण स्पॉटलाइट्सच्या उजेडाची, चेहरा रंगवून घेण्याची सवय लागली आणि त्यावर लोकप्रियतेचा वर्ख एकदा का चढला की असे साधे आणि खरे वागता येणे अवघड असते. लागू हे असे सहज साधे लीलया जगत.

याचे कारण उत्तम जागतिक वाङ्मयाच्या परिशीलनाने आणि जॉन गिलगुड वा लॉरेन्स ऑलिव्हिए यांच्या रंगभूमी वावराच्या अभ्यासाने आपण कोठे आहोत आणि कोठे जायला हवे याची पूर्ण जाणीव त्यांना होती. हे खूप महत्त्वाचे. डोळ्यांसमोर शिखर असले की वाटेतल्या लोकप्रियतेच्या टीचभर उंचवटय़ांकडे चेहऱ्यावरच्या मुरुमांप्रमाणे दुर्लक्ष करायची आपोआप सवय लागते. तशी ती न लागलेले ‘मी आज जो काही आहे’ वगैरे भाषा करू लागतात. लागूंचे तसे कधीही झाले नाही. या त्यांच्या भान असण्याचा योग्य परिणाम त्यांच्या अभिनयासह जगण्यात होत होता. त्याचमुळे, विषय कोणताही असो पण संघर्षांचे रूप मात्र सतत वडील-मुलगा याच पद्धतीने दाखवणाऱ्या वसंत कानेटकर यांची एरवीही ‘यशस्वी’ झाली असती अशी नाटके अधिक मोठी झाली ती लागूंच्या अभिनयामुळे. ‘हिमालयाची सावली’ अधिक मोठी झाली ती लागूंच्या आणि शांता जोग यांच्या संयत अभिनयामुळे हे नाकारता येणार नाही. अर्धागवायूने शरीर लुळे पडले की शब्द सहज फुटत नाहीत आणि तेच ते वाक्य पुन:पुन्हा पण वेगवेगळ्या कारणांसाठी उच्चारले जाते. या नाटकात तसे अर्धागवायूग्रस्त प्रा. नानासाहेब ‘त्याचं काय आहे’ हे तीन शब्दच वेगवेगळ्या भावना पोहोचवण्यासाठी वापरतात. लागूंची कलोत्तमता जाणून घेण्यासाठी ती भूमिका पाहायला हवी. एलकुंचवारांच्या ‘आत्मकथा’तही ते प्राध्यापक होते. या नाटकातील त्यांचा प्रा. राजाध्यक्ष आणि ‘हिमालयाची सावली’तील प्रा. नानासाहेब यांचा तिळमात्रही संबंध नाही. ‘सामना’ आणि ‘पिंजरा’ या दोन्ही चित्रपटांत ते मास्तर आहेत. पण त्या दोन्ही मास्तरांचा पोत कमालीचा वेगळा आहे. ‘मारुती कांबळेचं काय झालं’ हाच प्रश्न चिवट निलाजऱ्या सातत्याने विचारणारा ‘सामना’मधील मास्तर हा, आपण नर्तिकेच्या प्रेमात पडलो की काय या वास्तवाने भयभीत ओशाळा झालेल्या ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरांपेक्षा कमालीचा वेगळा आहे. हा वेगळेपणा दाखवण्याचे कौशल्य हे लागूंचे मोठेपण. ते उत्तम अर्थाने व्यावसायिक होते. म्हणजे ‘उत्तम भूमिका साकारण्यासाठी ती भूमिका वा कलाकृती आवडायलाच हवी असे अजिबात नाही,’ इतके प्रांजळ मत ते मांडत. नावडती कामेही आवडून घेऊन साकारणे ही खरी व्यावसायिकता. लागूंच्या ठायी ती पुरेपूर होती. ही बाब आपल्याकडे समजून घेण्याचे कारण म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवर उत्तमोत्तम कलाकृती सादर करणारे व्यावसायिक रंगभूमीवर वा त्या रंगभूमीवरील कलाकारांसमवेत काही कलाकृती सादर करण्याची वेळ आली की नाके मुरडतात. अथवा व्यावसायिकवरच्यांना कमी लेखतात. लागूंनी तसे कधीही केले नाही. अन्यथा पद्मा चव्हाण यांच्यासह ‘लग्नाची बेडी’ ते करते ना.

ही व्यावसायिक सचोटी आणि प्रामाणिक सामाजिक बांधिलकी हे लागूंचे खरे मोठेपण. यास प्रखर बुद्धिनिष्ठतेची जोड होती. प्रामाणिक बुद्धिनिष्ठ ज्याप्रमाणे निरीश्वरवादी असतो त्याप्रमाणे लागू हे नास्तिक होते. खरे तर या महाराष्ट्रास नास्तिकतेची मोठी परंपरा आहे. पण लागू ज्या काळात जन्मले त्या काळी परमेश्वरचरणी विलीनता हाच मोक्षमार्ग मानायची परंपरा रुजलेली होती. भिकार ऐहिकता सहन करत जगायचे आणि मरणोत्तर मोक्षाची (काल्पनिक) बेगमी करण्यासाठी आयुष्य घालवायचे असा हा बिनडोकपणा सर्रास सुरू आहे. लागूंनी त्यास निष्ठेने विरोध केला. आधुनिक याने अवकाशात सोडण्याची आस बाळगायची पण त्याआधी परमेश्वराच्या आशीर्वादासाठी अनुष्ठाने घालायची हा शास्त्रज्ञ म्हणवून घेणाऱ्यांतही दिसणारा दुटप्पीपणा त्यांनी कधी केला नाही. याबाबत ते स्वत:विषयीदेखील इतके निष्ठुर होते की त्यांचा मुलगा तन्वीर मुंबई-पुणे रेल्वे प्रवासात केवळ तिसऱ्या जगातच घडतील अशा अपघातात गेला तरीही त्यांना परमेश्वर आठवला नाही. या मुद्दय़ावर  विजय तेंडुलकर यांच्यासह पुण्यात झालेल्या संयुक्त मुलाखतीत याबद्दल छेडले असता लागूंनी ‘‘तन्वीर जाणे हा अपघात होता, त्या जागी अन्य कोणीही असू शकला असता,’’ असेच बुद्धिवादी उत्तर दिले. एरवी कायम गोलगोल भूमिका घेणाऱ्या तेंडुलकर यांना त्या वेळेस आपण कसे नियतीवादी आहोत हे कबूल करण्याचा सोयीस्करवाद मान्य करावा लागला होता, ही बाब महत्त्वाची. ‘‘परमेश्वरास निवृत्त करा’’ या लागूंच्या विधानामुळे त्यांना ही (म्हणजे पुत्रवियोगाची) शिक्षा झाली अशी निर्लज्ज विधाने सनातन्यांनी त्या काळी केली होती. कोणाही विवेकी बुद्धिवानाप्रमाणे लागूंनी त्यांची दखलही घेतली नाही

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा