व्यक्तीविशेष : डॉ. एम. के. भान

डॉ. एम. के. भान

                                      चीनमधील ‘करोना विषाणू’सारखी आणीबाणीची परिस्थिती उद्भवते तेव्हाच आपल्याला त्यावर उपाय शोधण्यासाठी जाग येते, पण काही द्रष्टे वैज्ञानिक हे पायाभूत काम पुढच्या गरजा ओळखून करीत असतात. त्यात भारतातील ख्यातनाम वैज्ञानिक तसेच जैवतंत्रज्ञान विभागातील माजी सचिव डॉ. महाराज किशन भान यांचा समावेश होता. ते बालरोगतज्ज्ञही होते. त्यांनी भारतातील जैवतंत्रज्ञान विभागात आरोग्य व पोषणावर जे प्रकल्प राबवले त्यातून त्यांच्यातील उत्तम प्रशासकाचे दर्शनही घडले. अतिसारावरील (डायरिया) ‘रोटोव्हॅक’ ही देशांतर्गत निर्मिती करण्यात आलेली लस तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कर्करोगाने त्यांचे निधन झाले. भारतात दरवर्षी ७८ हजार तर जगात पाच लाख बालके दरवर्षी अतिसाराने मरण पावतात. त्यांच्यासाठी रोटोव्हॅक ही लस बाजारात २५०० रुपयांना उपलब्ध होती, ती त्यांनी दीडशे रुपयांत उपलब्ध केली. संघटनकौशल्य वापरून सरकार, स्वयंसेवी संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था व खासगी संस्था यांची एकत्र मोट बांधून रोटोव्हॅक लस तयार करण्यात यश मिळवले. या लशीसाठी त्यांनी १९८५ पासून प्रयत्न सुरू केले होते, तर भारतात २०१६ मध्ये लशीला मान्यता मिळाली. नंतर सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात तिचा समावेश झाला. डॉ. भान यांनी हे सगळे काम शून्यातून उभे केले होते.

                                            १९४७ मध्ये जन्मलेले डॉ. भान यांनी पुण्याच्या आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज येथून एमबीबीएस पदवी घेतली. नंतर चंडीगडमधील पीआयएमईआर संस्थेतून एमडी पदवी घेतली. डॉक्टर असूनही नंतर ते अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेत जाऊन अतिसार व मुलांचे पोषण यांवरील संशोधनाकडे वळले. येथेच त्यांना रोटाव्हायरसचा एक कमकुवत धागा मिळाला, त्याला त्यांनी ‘११६ ई’ असे नाव दिले. त्याच वेळी अमेरिकेत एनआयएचचे रॉजर ग्लास याच दिशेने प्रयत्न करीत होते. पण डॉ. भान यांचे काम वेगळे होते.

                           जैवतंत्रज्ञान सचिव म्हणून त्यांनी २००५ ते २०१२ दरम्यान काम केले. त्यात त्यांनी फरिदाबाद येथे ‘ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूट’ ही संस्था स्थापन करण्यात मोठी भूमिका पार पाडली. भान यांनी अतिसाराच्या उपचारात झिंक म्हणजे जस्ताचा वापर केला, ओआरएसची नवी पद्धत विकसित केली. ई.कोलाय जिवाणूची अधिक आक्रमक प्रजाती शोधून काढली. त्यांना नवे विषय कधी वर्ज्य नव्हते, नवीन संशोधन घेऊन त्यांच्याकडे जाणाऱ्या तरुण वैज्ञानिकांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा