व्यक्तीविशेष : गाडगे महाराज

317

श्री डेबूजी झिंगराजी उर्फ गाडगे महाराज यांचा जन्म विदर्भातील कोते या खेडेगावी झाला. ते परीट समाजातील होते. गाडगे महाराजांनी वयाच्या आठव्या वर्षापासून आपल्या घरातील विपन्न परिस्थितीचे, आपल्या समाजाच्या मागासलेपणाचे, समाजाच्या अडाणीपणाचे निरीक्षण केले. महाराजांनी आपल्या मामाची शेती स्वतःच्या अपरिमित परिश्रमातून फुलवून अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा असलेल्या आपल्या समाजापुढे आपल्या श्रमांचा आदर्श ठेवला.

व्यक्तीविशेष : गाडगे महाराज

गाडगे महाराज कठोर परिश्रम करून जीवन जगत होते. एके दिवशी एका जटाधारी तेजस्वी योग्याने शेतात येऊन त्यांना प्रसाद दिला. रात्रभर त्यांना स्मशानात बसवून घेऊन आपली पारमार्थिक साधना त्यांनी गाडगे महाराजांना दिली. गाडगेमहाराजांना त्या जटाधारी योगी सत्पुरुषाने देवीदास म्हणून संबोधिले.

एके दिवशी रात्रीच्या वेळी सर्व झोपी गेले असता सर्वस्वाचा त्याग करून ते निघून गेले. गाडगे महाराजांनी बारा वर्षे अज्ञातवासात काढली. नंतर आपले तन, मन, धन जनसेवेत वेचण्यासाठी, लोककल्याणासाठी त्यांनी कठोर तप आचरिले. या काळात गाडगे महाराजांनी कदान्न सेवन करून, चिंध्या पांघरून, मस्तकी गाडगे धारण करून देहश्रमाची पराकाष्ठा केली. लोक त्यांना गाडगे महाराज म्हणून आदराने हाक मारू लागले.

लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्व गाडगे महाराजांनी लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रचार केला. प्रसार केला. गाडगे महाराज म्हणजे लोकजागृती साधणारे एक फिरते विद्यापीठ होते. गाडगेमहाराज जास्त शिकलेले नव्हते; परंतु संतांचे अभंग त्यांना तोंडपाठ होते. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ असा गजर केल्यानंतर लगेच हरिपाठ म्हणत. गाडगे महाराजांचे कीर्तन असले म्हणजे ते ऐकण्यासाठी लोक लांबलांबून येत.

गाडगे महाराजांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई येथे धर्मशाळा बांधल्या. जनकल्याणाची अनेक कामे त्यांनी यशस्वीरित्या राबविली. आपले जीवन त्यांनी विरागी व धर्मशील वृत्तीने व्यतीत केले. जाती, धर्म व वर्ण यांतील भेद त्यांच्याजवळ नव्हता. समतेचे ते पुरस्कर्ते होते. त्यांच्या अंतःकरणात लोककल्याणाची जबरदस्त भावना होती. लोकांनी त्यांना संत समजून त्यांच्याविषयी भक्ति बाळगली. सामान्य लोकांसाठी त्यांनी खूप कार्य केले. अखेर अमरावती येथे त्यांनी आपला देह ठेवला.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे – ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ – असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

गाडगे महाराज यांच्या पुण्यदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम