व्यक्तीविशेष : प्रा. अर्जुन देव

 

!!भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेशी संबंधित इतिहासकार. !! 


‘आयएएस’ होण्यासाठी अभ्यास करणाऱ्यांना प्रा. अर्जुन देव यांची पुस्तके माहीत असतात.. मग ‘हिस्टरी ऑफ द वर्ल्ड’ असो, ‘हिस्टरी ऑफ सिव्हिलायझेशन’ असो. ही पुस्तके आजही अभ्यासली जातात. या प्रा. अर्जुन देव यांचे निधन रविवारी, वयाच्या ८०व्या वर्षी झाले. ‘एनसीईआरटी’- अर्थात राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेत कार्यरत असताना रोमिला थापर, बिपन चंद्र, सतीश चंद्र आदी अव्वल आणि जगन्मान्य इतिहासकारांची पुस्तके निघाली, तीही प्रा. अर्जुन देव यांच्या संपादनाखाली.

 

‘देव’ हे त्यांचे आडनाव नव्हे. ‘अर्जुनदेव’ हे त्यांचे नाव. पण जातीचे नाव लावायचे नाही, म्हणून ‘अर्जुन देव’ याच नावाचा स्वीकार त्यांनी अधिकृतपणे केला होता. अखंड पंजाबातील लैया येथे १९३८ साली ज्या कुटुंबात अर्जुनदेव यांचा जन्म झाला, ते फाळणीच्या काळात दिल्लीस आले. फाळणीच्या यातना म्हणजे काय हे बालपणीच उमगलेल्या अनेकांचे देशप्रेम पुढे विद्वत्तेच्या रूपाने दिसले, त्यांपैकी अर्जुनदेव हे एक. दिल्लीच्या किरोडीमल महाविद्यालयात ते इतिहास शिकले. अर्जुन देव यांच्या पत्नी इंदिरा या देखील इतिहासकार. या दाम्पत्याने ‘एनसीईआरटी’साठी काम केले.

 

चोख, अचूक आणि आधुनिक-वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारी, कोठेही व्यर्थ अभिमानाचे भोंगळ प्रदर्शन न घडविणारी इतिहासाची पाठय़पुस्तके या दोघांनी घडविली. काही स्वत: लिहिली, काही इतरांकडून लिहून घेऊन संपादित केली. इतिहासाविषयीचा हा आधुनिक दृष्टिकोन भारतकेंद्री जरूर असावा; पण भल्याबुऱ्या सर्व प्रकारच्या अनुभवांनी आपला वर्तमान व भविष्य समृद्ध करणारा असावा, अशी आस ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिणाऱ्या पं. जवाहरलाल नेहरूंनाही होती. हा विचार कठोर विद्यापीठीय शिस्तीने अमलात आणणाऱ्या इतिहासकारांवर पुढे (१९९५ नंतर) ‘काँग्रेसी’ वगैरे शिक्के मारून त्यांना नाकारण्याचे उद्योग सुरू झाले. परिणामी अर्जुन देव लिखित ‘हिस्टरी ऑफ द वर्ल्ड’ हे पुस्तकही होते.

 

ते ‘एनसीईआरटी’ने रद्द केले. मात्र ‘ओरिएंट ब्लॅकस्वान’ने ते प्रकाशित केले आणि आज केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या अनेक संकेतस्थळांवरही तेच वापरले जाते. एकंदर १६ पुस्तके अर्जुन देव यांच्या नावावर असली, तरी महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘टुवर्ड्स फ्रीडम’चे तीन खंड! त्यांपैकी पहिला (१९४१ पर्यंतचा) खंड प्रकाशित झाल्यानंतर, गेल्या साडेपाच वर्षांत पुढील दोन खंड प्रकाशित झाले नव्हते. ते जसेच्या तसे वा तळटीपांसह प्रकाशित होणे, ही प्रा. अर्जुन देव यांच्या विद्वत्तेस खरी आदरांजली ठरेल.


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा