व्यक्तीविशेष : अरुण जेटली[भाजपचे चाणक्य]

भारतीय जनता पक्षाचा एक हसतमुख आणि आश्वासक चेहरा, अर्थशास्त्राचे अभ्यासक, संकटमोचक, आक्रमक, प्रवाही भाषणाने आणि गतीमान कार्यशैलीने विरोधकांसह स्वपक्षीय तसेच जनतेवर छाप सोडणारे व्यक्तीमत्व म्हणजे दिवंगत अरुण जेटली होय. आज त्यांची जयंती. यानिमित्त जाणून घेऊ त्यांच्या जीवनातील विविध पैलू…

नोटबंदी, राफेलचा मुद्दा असो की, अन्य कोणताही प्रश्न भाजपासाठी संकटमोचक म्हणून जेटली नेहमीच पुढे येत राहिले. सरकारची बाजू ठामपणे मांडताना व सरकारसाठी ढाल म्हणून ते नेहमीच आपली बाजू मांडत राहिले.

संसदेत असो वा आंदोलनात, ते नेहमीच उत्तर देण्यासाठी सज्ज असायचे. म्हणूनच पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य म्हणून अरुण जेटली यांच्याकडे पाहिले जात.

मधुमेहापासून कॅन्सरपर्यंत अनेक आजारांशी झुंज देणारे जेटली यांनी गेली अनेक वर्षे मोदी सरकारचे संकटमोचक ही भूमिका निभावली.

नवी दिल्लीमध्ये 28 डिसेंबर 1952 रोजी जन्मलेल्या जेटली यांनी दिल्ली विद्यापीठात अभाविप नेते म्हणून सार्वजनिक कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू केली.

आणीबाणी दरम्यान त्यांना 19 महिन्यांचा कारावास झाला. तिहार जेलमधील ‘त्या’ दिवसांवर त्यांनी लिहीलेल्या आठवणींचे पुस्तकही चांगलेच गाजले.

भाजपमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी 1991 पासून सक्रिय राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. अटलबिहारी वाजपेयी मंत्रिमंडळामध्ये ते कायदामंत्री तर मोदी सरकारमध्ये त्यांनी मुख्यत्वे अर्थ व संरक्षण अशी महत्वाची मंत्रिपदे सांभाळली.

इंग्रजीवर कमालीचे प्रभुत्व असलेले जेटली हे जटील कायदेशीर मुद्यांवर तत्काळ व वस्तुनिष्ठ मतप्रदर्शन करण्यासाठी व शाब्दीक कोट्या करून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी प्रसिध्द होते.

राज्यसभेत तर भाजपसाठी जेटली यांचे केवळ असणे म्हणजे फार मोठा आधार असे. 2009 ते 2014 या काळात विरोधी पक्षनेते व 2014 -19 या काळात राज्यसभेतील सभागृहनेते म्हणून जेटली यांनी अत्यंत प्रबावी कामगिरी बजावली.

लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी स्वतःच मंत्रीपद सांभाळणे शक्य होणार नसल्याचे जाहीर केले होते. तरीही त्यांनी ब्लॉग लेखनाद्वारे मते मांडणे हिरीरीने सुरूच ठेवले होते.

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा