नाम व नामाचे प्रकार

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
2,049

नाम व त्याचे प्रकार

प्रत्यक्षात असणार्‍या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला ‘नाम’ असे म्हणतात.

उदा.

  • टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खोटेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इ.

 नामाचे प्रकार :

नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात.

  • सामान्य नाम –

एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला ‘सामान्य नाम’ असे म्हणतात.

उदा.

  • मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ.

सामान्य नाम 

                   विशेषनाम

पर्वत

हिमालय, सहयाद्री, सातपुडा

मुलगा

स्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण, कपिल, भैरव

मुलगी

मधुस्मिता, स्वागता, तारा, आशा, नलिनी

शहर

नगर, पुणे, दिल्ली, मुंबई, कोल्हापूर

नदी

गंगा, सिंधू, तापी, नर्मदा, गोदावरी

  • टीप : (सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.)

  • विशेष नाम –

ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास ‘विशेष नाम’ असे म्हणतात.

उदा.

  • राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन, अमेरिका,गोदावरी इ.

  • टीप : (विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नसल्यास सामान्य नाम समजावे.)
    उदा. या गावात बरेच नारद आहेत.

  • भाववाचक नाम –

ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला ‘भाववाचक नाम’ असे म्हणतात.

उदा.

  • धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.

टीप : (पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिति किंवा क्रिया दाखविणार्‍या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात.)

   भाववाचक नामे साधण्याचे प्रकार –

सामान्यनामे व विशेषनामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, या यासारखे प्रत्यय लावून नामे तयार होतात ती खालीलप्रमाणे –

शब्द

प्रत्यय

भाववाचक नाम

इतर उदाहरणे

नवल

आई

नवलाई

खोदाई, चपडाई, दांडगाई, धुलाई

श्रीमंत

श्रीमंती

गरीबी, गोडी, लबाडी, वकिली

पाटील

की

पाटीलकी

आपुलकी, भिक्षुकी

गुलाम

गिरी

गुलामगिरी

फसवेगिरी, लुच्चेगिरी

शांत

ता

शांतता

क्रूरता, नम्रता, समता

मनुष्य

    त्व

     मनुष्यत्व

          प्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व

शहाणा

पण, पणा

शहाणपण, पणा

देवपण, प्रामाणिकपणा, मोठेपण

सुंदर

सौदर्य

गांभीर्य, धैर्य, माधुर्य, शौर्य

गोड

वा

गोडवा

ओलावा, गारवा

नामाचे कार्य करणारे इतर शब्द :

टीप : नाम, सर्वनाम, विशेषण, ही जी नावे शब्दांच्या जातीला दिली जातात, ती त्यांच्या त्या त्या वाक्यातील कार्यावरून दिली जातात तीच गोष्ट येथेही लक्षात ठेवावयास हवी, सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचकनाम ही नावे देखील नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिली गेली आहेत.

अशाच पद्धतीने नामांच्या कार्यावरून त्यांचे काही नियम आहेत ते खालीलप्रमाणे-

नियम –

1. केव्हा-केव्हा सामान्यनाम हे विशेषनामांचे कार्य करतात.

उदा.

  • आत्ताच मी नगरहून आलो.

  • शेजारची तारा यंदा बी.ए. झाली.

वरील वाक्यामध्ये वापरली गेलेली नगर कोणतेही शहर, तारा(नक्षत्र) ही  मुळीच सामान्यनामे आहेत परंतु येथे ती विशेषनामे म्हणून वापरली गेलेली आहेत.

2. केव्हा-केव्हा विशेषनाम सामान्य नामाचे कार्य करतात.

उदा.

  • तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.

  • आमचे वडील म्हणजे जमदग्नि आहेत.

  • आम्हाला आजच्या विधार्थ्यात सुदाम नकोत भीम हवेत.

वरील वाक्यांत कुंभकर्ण, जमदग्नि, सुदाम, भीम गे मुळची विशेषनामे आहेत.
पण येथे कुंभकर्ण अतिशय झोपाळू, जमदग्नि = अतिशय रागीट मनुष्य, सुदाम=अशक्त मुलगे व भीम=सशक्त मुलगे या अर्थाने वापरली आहेत. म्हणजे मुळची विशेषनामे वरील वाक्यांत सामान्य नामांचे कार्य करतात.

3. केव्हा-केव्हा भाववाचक नामे विशेषनामांचे कार्य करते.

उदा.

  • शांती ही माझ्या बहिणीची मुलगी आहे.

  • विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.

  • माधुरी उधा मुंबईला जाईल.

वरील वाक्यात अधोरेखित केलेली शब्दे ही मुळची भाववाचक नामे आहेत. पण याठिकाणी त्यांचा वापर विशेषणामासारखा केला आहे.

4. विशेषनामाचे अनेकवचन होत नाही झाल्यास त्यांना सामान्यनाम म्हणतात.

उदा. 

  • आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.

  • या गावात बरेच नारद आहेत.

  • माझ्या आईने सोळा सोमवारांचे व्रत केले.

विशेषनामाचे अनेकवचन होत नाही पण वरील वाक्यात विशेषनामे अनेकवचनी वापरलेली दिसतील या वाक्यातील विशेषनामे म्हणून वापरली आहेत.

5. विशेषण केव्हा-केव्हा नामाचे कार्य करतात.

उदा. 

  • शहाण्याला शब्दांचा मार.

  • श्रीमंतांना गर्व असतो.

  • जातीच्या सुंदरांना काहीही शोभते.

  • जगात गरीबांना मान मिळत नाही.

वरील वाक्यात विशेषण ही नामासारखी वापरली आहेत.

6. केव्हा-केव्हा अव्यय नामाचे कार्य करतात.

उदा.  

  • आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली.

  • त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.

  • नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली.

वरील वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्यये ही नामाची कार्य करतात.

7. धातू-साधिते केव्हा-केव्हा नामाचे कार्ये करते.

उदा.

  • ज्याला कर नाही त्याला डर कसली.

  • गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते.

  • ते ध्यान पाहून मला हसू आले.

  • देणार्‍याने देत जावे.

वरील उदाहरणांवरून असे दिसून येते की, सामान्यपणे, विशेषनामे व भाववाचकनामे ही एकमेकांचे कार्य करतांना आढळतात. तसेच विशेषणे, अव्यय, धातुसाधिते यांचा वापरसुद्धा नामांसारखा करण्यात येतो.


हे  सुद्धा वाचा :- 


 

 

नाम व नामाचे प्रकार 1

टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.